News Bharati

‘मिस इंडिया अर्थ’ सायली सुर्वेची घरवापसी; छळ आणि धर्मांतरानंतर पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म

पुणे (पिंपरी-चिंचवड) : ग्लॅमर जगतात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या ‘मिस इंडिया अर्थ २०१९’ ची विजेती सायली सुर्वे हिने पुन्हा एकदा आपल्या मूळ हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. एका मुस्लिम व्यावसायिकाशी विवाह केल्यानंतर झालेला मानसिक आणि शारीरिक छळ, तसेच जबरदस्तीने करण्यात आलेले धर्मांतर याविरोधात आवाज उठवत सायलीने हा धाडसी निर्णय घेतला आहे.

सायलीने २०१७ मध्ये कुटुंबाच्या विरोधात जाऊन मीरा-भायंदर येथील व्यावसायिक आतिफ तासे याच्याशी आंतरधर्मीय विवाह केला होता. लग्नानंतर तिचे धर्मांतर करून ‘अतेजा तासे’ असे नाव ठेवण्यात आले होते. मात्र, सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या सायलीच्या आयुष्यात लग्नानंतर काही काळातच छळाचे सत्र सुरू झाले.

मीडियासमोर आपली व्यथा मांडताना सायलीने खळबळजनक आरोप केले आहेत. आतिफ तासे याच्याशी लग्न करणे ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, असे तिने म्हटले आहे. तिला केवळ मारहाणच नाही, तर धर्मांतराच्या नावाखाली मानसिकदृष्ट्याही खचवण्यात आले. आपल्या चार मुलांच्या भविष्यासाठी सायलीने तब्बल १० वर्षे हा अन्याय सहन केला. तिने पोलीस तक्रारीही केल्या, परंतु तिला अपेक्षित मदत मिळाली नाही. अखेर सहनशक्तीचा अंत झाल्यावर तिने या नात्यातून बाहेर पडण्याचा आणि आपल्या मुळांकडे परतण्याचा निर्णय घेतला.

काही हिंदू संघटनांच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवडमध्ये वैदिक मंत्रोच्चार आणि हवनासह सायलीचा शुद्धीकरण सोहळा पार पडला. या विधीनंतर तिने ‘आद्या सुर्वे’ हे नवीन नाव धारण केले आहे.

\”कोणत्याही मुलीने छळ सहन करू नये. देवाने आपल्याला या ‘रावणां’समोर हार मानण्यासाठी जीवन दिलेले नाही,\” अशा शब्दांत आद्या (सायली) सुर्वेने महिलांना अन्यायाविरोधात लढण्याचे आवाहन केले आहे. मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि स्वतःच्या स्वाभिमानासाठी बाहेर पडणे गरजेचे होते, असेही तिने स्पष्ट केले.