News Bharati

…तर लगेच राजीनामा देणार! धनंजय मुंडेंची स्पष्ट भूमिका

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. या हत्याकांडात वाल्मिक कराडसह आठ जणांना अटक करण्यात आली असून, कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असल्याने विरोधक आणि सामाजिक कार्यकर्ते त्यांच्यावर कारवाईची मागणी करत आहेत. कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बीडमधील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांसह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मुंडेंविरोधातील पुरावे सादर केले. ते म्हणाले, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही कागदपत्रे माझ्याकडे दिली आहेत. मी ती कागदपत्रे पाहिली आहेत. ती कागदपत्रे तपासणीसाठी मी संबंधित यंत्रणांना दिली आहेत. त्यामध्ये काही तथ्य आढळले तर त्याबाबत नक्कीच कारवाई होईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसमोर स्पष्ट भूमिका घेत, “अजितदादांनी आदेश दिला, तर मी तत्काळ राजीनामा देईन,” असे सांगितले.

माझ्या संदर्भात काय करायचं ते अजितदादाच ठरवतील, काहीजण वैयक्तिक रागातून माझ्यावर आरोप करत आहेत असे मुंडे म्हणाले. त्यामुळे या प्रकरणातील पुढील राजकीय घडामोडींकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *