News Bharati

डहाणू-तलासरीतील ६५६ कुटुंबांची ‘घरवापसी’; ३ हजारांहून अधिक आदिवासी बांधवांचा हिंदू धर्मात जाहीर प्रवेश

डहाणू : पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यात एक ऐतिहासिक घटना घडली आहे. विविध प्रलोभने आणि सामाजिक-आर्थिक कारणांमुळे ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या ६५६ कुटुंबांतील ३ हजारांहून अधिक आदिवासी बांधवांनी पुन्हा एकदा आपल्या मूळ हिंदू (सनातन) धर्मात जाहीर प्रवेश केला आहे.

हा भव्य सोहळा रविवार, ८ मार्च २०२६ रोजी डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध शक्तिपीठ महालक्ष्मी (विवाळवेढे) येथे पार पडला. ‘वनबंधू ट्रस्ट’ आणि ‘भारत विकास संगम’ यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात संपूर्ण परिसर जय श्रीराम आणि हर हर महादेवाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.

हरेश्वर वनगा यांनी मंत्रोचारात विधिवत पूजा आणि हवन केले. या पवित्र अग्नीच्या साक्षीने सर्व कुटुंबांनी स्वधर्माचा स्वीकार केला. बरुमालधामचे पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी विद्यानंदजी सरस्वती आणि सदानंदजी महाराज यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. \”आपल्या मूळ संस्कृतीकडे आणि मुळांकडे परतणे, हाच खऱ्या अर्थाने आत्मसन्मान आहे,\” असे सांगत स्वामीजींनी स्वधर्मात परतलेल्या बांधवांचे स्वागत केले.

यावेळी, केवळ धर्मांतरच नव्हे, तर या कुटुंबांना सामाजिक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. स्वधर्मात परतलेल्या भगिनींना साडी-चोळी देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व कुटुंबांना आवश्यक घरगुती साहित्याचे वाटप करण्यात आले. या सोहळ्याला ‘योगायतन ग्रुप’चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंह, माजी आ. श्रीनिवास वनगा, ‘भारत विकास संघा’चे संजय पटेल, ‘वनबंधू ट्रस्ट’चे अध्यक्ष लादूलाल सोनी, ‘भारतीय सरपंच परिषदे’चे अध्यक्ष सुरेश शिंदा, प्रशांत धामणकर आणि ‘महालक्ष्मी ट्रस्ट’चे अध्यक्ष संतोष देशमुख यांसह अनेक मान्यवरांनी या उपक्रमाला पाठबळ दिले.

कार्यक्रमात उपस्थितांनी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या ‘जबरदस्ती धर्मांतर विरोधी विधेयका’चे जोरदार स्वागत केले. आदिवासी समाजातील अवैध आणि सक्तीचे धर्मांतर थांबवण्यासाठी हा कायदा प्रभावी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.