News Bharati

लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घ्या – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

लातूर : जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी हितावह असणारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी प्रयत्न करावेत. जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रशासनाने अधिक गतीने आणि समन्वयाने काम करावे, अशा सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (ShivendrasinhRaje Bhosale) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिल्या.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून अधिकाधिक निधी मिळविण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे सांगून पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांना लाभदायक ठरणारी विकास कामे करण्यावर सर्व विभागांनी भर द्यावा. यासाठी लोकप्रतिनिधींना विश्वात घेवून काम करावे. जिल्ह्याच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या चांगल्या उपक्रमाला आपला पाठींबा राहील. मात्र, कोणत्याही चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातले जाणार नाही. तसेच जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री म्हणून सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

लातूर ते टेंभूर्णी महामार्गाचे रुंदीकरण, जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याला आपले प्राधान्य राहणार आहे. तसेच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाला नवीन एमआरआय मशीन घेण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. यासोबतच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी सीएसआर फंडातून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री ना. भोसले म्हणाले. लातूर जिल्ह्याने शिक्षण क्षेत्रातील वेगळा पॅटर्न तयार केला आहे, याप्रमाणेच जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विकासाचा नवा पॅटर्न निर्माण करावा. आपल्या कार्यकाळात जिल्ह्याच्या विकासात भरीव योगदान देण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी जिल्ह्यातील विविध विकास कामांची पीपीटीद्वारे माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त पांदन रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने तहसीलदार यांनी कार्यवाही सुरु केली आहे. जिल्ह्यातील विविध क्षेत्रांचा अभ्यास करून जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार दरवर्षी करावयाच्या कामांचे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी, आरोग्य, उद्योग, प्राथमिक शिक्षण, कौशल्य विकास, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन यासह विविध विभागांचा पालकमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला.

शासकीय जमिनींची माहिती आता एका क्लिकवर

लातूर जिल्ह्यातील सर्व शासकीय व गायरान जमिनींची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या संगणक प्रणालीचे उद्घाटन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते रिमोटद्वारे करण्यात आले. या उपक्रमामुळे विविध विकास कामांसाठी जिल्ह्यातील शासकीय जमिनींची माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *