News Bharati

राजकोट किल्ल्यावर ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी घातला राडा

सिंधुदुर्ग येथील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना दोन दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यावरून राजकारण तापलं आहे. यातच आज (२८ ऑगस्ट) महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली. भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे आणि नितेश राणे हे राजकोट किल्ल्यावर पोहोचले. त्यावेळेस ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि नारायण राणे यांचे समर्थक आमने-सामने आल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

यानंतर नारायण राणे आणि निलेश राणे हे देखील चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी राणे यांचे समर्थक आणि पोलिसांमध्येही बाचाबाची झाली. आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनीही किल्ल्यावर काहीवेळ ठिय्या आंदोलन केलं. तसेच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनीही जोरदार घोषणाबाजी केली ठाकरे गट आणि भाजपाचे कार्यकर्ते अशा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरादार घोषणाबाजी केल्यामुळे काहीवेळ राजकोट किल्ल्यावर ताणाव निर्माण झाला होता. मात्र, यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन करत समजूत घातली. यानंतर आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, जयंत पाटील हे राजकोट किल्ल्यावरून बाहेर पडले.

किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या पुतळ्याची उभारणी नौदलामार्फत करण्यात आल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारने दिलं आहे तरी पण विरोधी पक्षांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर या दुर्घटनेचं खापर फोडलं. या घटनेस सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे जबाबदार असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *