News Bharati

मोहिते-पाटलांना टक्कर देणाऱ्या राम सातपुते यांचे भाजपमध्ये प्रमोशन; राज्य कार्यकारिणीत ‘चिटणीस’पदी वर्णी!

सोलापूर : भारतीय जनता पक्षाची बहुप्रतीक्षित राज्य कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अखेर जाहीर केली असून, यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील तरुण नेतृत्व आणि माजी आमदार राम सातपुते यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सातपुते यांची भाजपच्या ‘राज्य चिटणीस’ पदी नियुक्ती करण्यात आली असून, यामुळे पक्षांतर्गत त्यांचे राजकीय वजन वाढल्याचे मानले जात आहे.

राम सातपुते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक मानले जातात. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून (ABVP) राजकीय प्रवास सुरू करणाऱ्या सातपुते यांना २०१९ मध्ये माळशिरसची उमेदवारी मिळाली आणि ते पहिल्याच प्रयत्नात आमदार झाले. लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवली. जरी तिथे त्यांना पराभव पत्करावा लागला, तरी त्यांनी माळशिरस सोडले नाही.

सोलापूर जिल्ह्यात, विशेषतः माळशिरस परिसरात मोहिते-पाटील आणि राम सातपुते यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. लोकसभेतील पराभवानंतरही सातपुते यांनी स्थानिक पातळीवर आपली पकड मजबूत ठेवली. अकलूज नगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत त्यांनी भाजपला चांगले यश मिळवून दिले, तसेच त्यांच्या पत्नी संस्कृती सातपुते या जिल्हा परिषदेवर निवडून आल्या. मोहिते-पाटलांच्या साम्राज्याला निकराने टक्कर देणाऱ्या सातपुते यांच्या पाठीशी भाजपने आता संघटनेत पद देऊन ताकद उभी केली आहे.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केलेल्या ४३ जणांच्या जम्बो कार्यकारिणीत १२ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस आणि १२ चिटणीसांचा समावेश आहे. नव्या-जुन्यांच्या या मेळात राम सातपुते यांना चिटणीसपद देऊन भाजपने आपली रणनीती स्पष्ट केली आहे.