News Bharati

रामनवमीनिमित्त ठाण्यात ‘संगीत रामायण (हिंदी)’ सोहळ्याचे आयोजन

ठाणे : रामनवमीचे औचित्य साधून ठाण्यातील रसिक प्रेक्षकांसाठी प्रभू श्रीरामांच्या जीवनकार्यावर आधारित “संगीत रामायण (हिंदी)” या भव्य संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गंधार इव्हेंट्स आयोजित आणि एस.डी. आर्ट्स निर्मित हा सोहळा गुरुवार, २६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४:०० ते ७:०० या वेळेत राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे संपन्न होणार आहे.

हा कार्यक्रम महर्षी वाल्मिकी यांच्या अमर काव्यरचनेवर आधारित असून, प्रभू श्रीरामांच्या जीवनातील विविध आदर्श, मूल्ये आणि महत्त्वाचे प्रसंग संगीताच्या माध्यमातून रसिकांसमोर उलगडले जाणार आहेत. या कार्यक्रमाचे संगीत दिग्दर्शन प्रसिद्ध विदुषी श्रीमती आशा खाडिलकर यांनी केले असून, गीत रचना सुनील सुधाकर देशपांडे यांची आहे.

या सांगीतिक सोहळ्यात सुप्रसिद्ध गायक वेदश्री ओक, केतकी चैतन्य, डॉ. राम पंडित आणि आमोद दातार आपल्या सुरांनी रंगत आणणार आहेत. कार्यक्रमाचे ओघवते निवेदन कौस्तुभ दिवाण करणार आहेत. उत्कृष्ट वाद्यवृंद आणि आकर्षक नृत्याची जोड लाभल्यामुळे हा सोहळा अधिकच दर्जेदार आणि प्रेक्षणीय ठरणार आहे.

या सांस्कृतिक उपक्रमास पीस्क्वेअर एज्यूस्पोर्ट्स फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर आयोजित या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.