News Bharati

महाराष्ट्र देणार देशाला व जगाला उत्तम कौशल्य असलेले मनुष्यबळ – चंद्रकांत पाटील

जळगाव : येणाऱ्या काळात उत्तमोत्तम कौशल्य असलेली पिढी घडविण्यासाठी अधिकाधिक शिक्षणावर खर्च करायचा असून देशाला आणि जगाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आपला महाराष्ट्र देईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले.

अमळनेर येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्राचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आयोजित कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. जिल्हा प्रशासनाने यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती.

यावेळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, माजी आमदार शिरीष चौधरी, विद्यापीठाचे सिनेट सदस्य, नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक राजेश पांडे, प्र. कुलगुरू जोगेंद्रसिंह बिसेन उपस्थित होते.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून विविध अभ्यासक्रमाबरोबर गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी अमळनेरच्या उपकेंद्रात स्वतंत्र व्यवस्था व्हावी. या केंद्राचे बांधकाम लवकरात लवकर होईल हे पाहावे, रेल्वेच्या ११ हजार जागांची भरती निघणार आहे. अशा विविध स्पर्धा परीक्षा आपल्या विद्यार्थ्यांना माहिती होत नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये आपली मुलं, मुली दिसत नाहीत. त्यामुळे विनाविलंब हे केंद्र सध्या भाड्याच्या जागेत सुरु करा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील यांनी दिले.

आपल्याकडे शिक्षणासाठी इमारती उभ्या करतो, पण अभ्यासासाठी लागणारा ज्ञानसाठा (कन्टेन्ट बिल्डिंग) उभा करण्यात कमी पडतो, ते आता उभं करणं गरजेचे असून जगभरातल्या भाषा आपल्या विद्यार्थ्यांना अवगत व्हाव्यात, अनेक देशांना आपल्याकडून उत्तम मनुष्यबळाची आवश्यकता आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे. त्या दृष्टीने शासन शिक्षणात अमूलाग्र बदल करत असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *