News Bharati

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना : राज्यातील पहिली ट्रेन कोल्हापुरातून अयोध्येला रवाना; ८०० ज्येष्ठ तीर्थयात्रींची सहभागिता

कोल्हापूर : आपली वडीलधारी मंडळी ही आपली संपत्ती असून आजवर त्यांनी कष्ट उपसले आहेत. त्यांचे अनुभव, ज्ञान ही आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे. त्यामुळं त्यांच्या आयुष्यात आनंद, समाधानाचे क्षण आणण्याची जबाबदारी आपलीच आहे. याच भावनेतून आपण राज्यातील सर्व धर्मियांतील ६० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ (Mukhyamantri Teerth Darshan Yojana) सुरु केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ई-संदेशाद्वारे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’चा राज्यस्तरीय ई- शुभारंभ पार पडला. यावेळी कोल्हापूर येथे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी हिरवा झेंडा दाखवून विशेष रेल गाडी रवाना झाली. ८०० तीर्थयात्री दर्शनासाठी विशेष गाडीने मार्गस्थ झाले. यावेळी खासदार धैर्यशील माने उपस्थित होते.

\”या योजनेचा शुभारंभ दक्षिण काशी आई अंबाबाईच्या करवीर येथून होत असल्याचा मनापासून आनंद होत आहे. त्यांनी आई अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होऊन सामाजिक क्रांतिचे प्रणेते राजर्षी शाहू महाराजांनाही विनम्र अभिवादन केले. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील पहिली विशेष गाडी आयोध्येसाठी रवाना होते आहे. प्रभू श्री रामांचे दर्शन घेण्याचं संधी या यात्रेच्या शुभारंभाच्या निमित्ताने यात्रेकरूंना मिळतेय, त्यामुळे दक्षिण काशी कोल्हापूर ते प्रभू श्री रामांची जन्मभूमी आयोध्या या तीर्थयात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व ज्येष्ठांचे अभिनंदन व त्यांना शुभेच्छा,\” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुभेच्छा संदेशाद्वारे म्हणाले.

तीर्थयात्रेत सहभागी ज्येष्ठांसाठी रेल्वेत औषधे, वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. जेष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सामाजिक न्याय विभागाचे १०, वैद्यकिय मतदतीसाठी ३ तर आयआरसीटीसीचे २४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. कोल्हापुरातून सुरु झालेल्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची आता राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांमधून अमंलबजावणी सुरु होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *