News Bharati

सर्व काही सरकार करेल ही चुकीची भावना : डॉ. कृष्णगोपालजी यांचे प्रतिपादन

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’तर्फे (RSS Janakalyan Samit) दरवर्षी ‘पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान केला जातो. राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील ‘गोयल ग्रामीण विकास संस्थान’ आणि भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक, माजी कप्तान पी. आर. श्रीजेश यांना यंदाचा पुरस्कार पुण्यात नुकताच प्रदान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात उपस्थित प्रत्येकाच्या मनात सेवेची भावना निश्चितपणे जागृत झाली आणि हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले.

कार्यक्रमात ‘गोयल ग्रामीण विकास संस्थान’चे अध्यक्ष श्री. ताराचंदजी गोयल आणि पी. आर. श्रीजेश यांचा सन्मान श्री संकेश्वर पीठाचे श्री स्वामी शंकराचार्य यांच्या हस्ते करण्यात आला. शाल, श्रीफल, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपालजी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते. राष्ट्रीय स्तरावरील या पुरस्कारासाठी यंदा कृषी आणि क्रीडा ही क्षेत्र निश्चित करण्यात आली होती.

‘हे समाजाचेच दायित्व’
सेवा, समाजात जागृत असलेला सेवाभाव आणि सेवेची आवश्यकता यासंबंधी डॉ. कृष्णगोपालजी यांनी सुंदर विवेचन केले. सर्व काही सरकार करेल ही पाश्चात्य आणि चुकीची धारणा आहे. सुरक्षा, न्याय अशा काही व्यवस्था आणि छोटी, मोठी कामे सरकार निश्चितपणे करेल. परंतु, समाजासाठी आवश्यक प्रत्येक काम करणे हे समाजाचेच दायित्व आहे. हा विश्वास समाजात पुनर्स्थापित करूया. यासाठीच ‘जनकल्याण समिती’सारख्या संस्थांचे कार्य अधिक गतीने पुढे जाणे आवश्यक आहे. त्यातूनच समाज प्रगती करेल, असा विश्वास डॉ. कृष्णगोपालजी यांनी व्यक्त केला.

संघाचे कार्यकर्ता निर्माणाचे कार्य प्रारंभीची अनेक वर्षे समाजाच्या लक्षातच आले नाही. संघ युवकांची शक्ती वाया घालवत आहे, अशीही टीका त्या काळात झाली. परंतु नंतर समाजाविषयीची तळमळ आणि समाजाचे दुःख हे आपले दुःख मानून संघ स्वयंसेवकांनी हजारो सेवाकार्ये सुरू केली. त्याचा लाखो जणांना लाभ झाला. समाजात जाऊन आवश्यक सेवाकार्य करण्याची ही संघाची कार्यशैली अद्भुत ठरली, असेही डॉ. कृष्णगोपालजी म्हणाले.

\"Displaying

‘महाकुंभ हे आध्यात्मभावाचेच प्रकटीकरण’
भक्तीभावाचे नाव आध्यात्म आहे आणि संवेदना, करुणा, हे आध्यात्माचे मूळ आहे. भक्तीचा भाव देशाला जोडून ठेवतो. हा भक्तिभाव केवळ भारतातच आहे. नुकताच प्रयागराज येथे झालेला महाकुंभ हेही आध्यात्मभावाचेच प्रकटीकरण आहे. करुणा, प्रेम, समर्पण हा भाव कुंभामध्ये दिसला. महाकुंभ हा ऐक्य भावाचे प्रतीक आहे, असेही ते म्हणाले.

जगात भारताला विश्वगुरू हा सन्मान निश्चितपणे प्राप्त होईल. विश्वगुरू होण्याकडे भारताची वाटचाल सुरू झाली आहे. राजकारण आणि धर्मकारण एकत्र आल्यास भारत विश्वगुरू होईल, असा विश्वास श्री स्वामी शंकराचार्य यांनी कार्यक्रमात व्यक्त केला.

‘गोयल ग्रामीण विकास संस्थान’तर्फे सेंद्रिय शेती आणि त्या विषयातील संशोधनाचे महत्त्वपूर्ण तसेच सफल कार्य सुरू आहे. त्याचे मॉडेल देशात ठिकठिकाणी दाखवण्याचे प्रयत्न झाले तर शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल, असे संस्थेचे अध्यक्ष ताराचंद गोयल यांनी सांगितले. या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवनकुमार टाक हेही यावेळी उपस्थित होते.

हॉकीमध्ये मी जी कामगिरी करू शकलो त्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करणारा खेळाडू तयार करणे आणि देशासाठी असा खेळाडू शोधणे हे माझे लक्ष्य आहे. हॉकीमध्ये ब्राँझ पदकाकडून सुवर्णपदकाकडे आपल्या देशाची कामगिरी करण्याचे आमचे ध्येय आहे, असे मनोगत पी. आर. श्रीजेश यांनी व्यक्त केले.

‘जनकल्याण समिती’चे अध्यक्ष डॉ. अजित मराठे यांनी प्रास्ताविकामध्ये समितीच्या सेवा प्रकल्पांची माहिती दिली. डॉ. प्रांजली देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

पुरस्काराची रक्कम ‘सेवा भारती संस्थे’ला
पुरस्कार स्वरूपात मिळालेली सर्व रक्कम श्री. ताराचंद गोयल यांनी ‘सेवा भारती संस्थे’ला देत असल्याचे मनोगत व्यक्त करताना जाहीर केले. या घोषणेमुळे सेवा आणि त्याग यांची आगळी अनुभूती उपस्थितांना आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *