News Bharati

चेकअपनंतर एकनाथ शिंदे रुग्णालयातून बाहेर; स्वतः दिली आरोग्याबाबत माहिती

ठाणे – महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आज दुपारी ठाणे (Thane) येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांना ताप आला होता आणि त्यांच्या पांढऱ्या पेशी वाढल्या होत्या, तसेच घशात संसर्ग झाल्याचे समजले आहे. उपचारानंतर ते काही वेळाने रुग्णालयातून बाहेर पडले आणि मुंबईकडे रवाना झाले.

शिंदे यांचा चेकअप झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची प्रकृती सुधारल्याचे सांगितले. रुग्णालयातून बाहेर पडताना शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, “माझी तब्येत चांगली होती. चेकअपसाठी आलो होतो. मी प्रकृती उत्तम आहे.” त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी लता शिंदे आणि मुलगा श्रीकांत शिंदे हेही उपस्थित होते.

शिंदे गेल्या काही दिवसांपासून आजारी असून, साताऱ्यातील दरेगावात दोन दिवस मुक्काम केल्यानंतर ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी आराम करत होते. भाजप नेते गिरीश महाजन यांनी काल रात्री शिंदे यांच्या घरी भेट दिली होती, त्यावेळी शिंदे यांना सलाईन लावलेली होती, अशी माहिती महाजन यांनी दिली होती.

रुग्णालयात शिंदे यांचा एक्स-रे आणि सिटी स्कॅन करण्यात आला. डॉक्टरांनी त्यांच्या छातीतील इन्फेक्शनची तपासणी केली. त्यांच्या घशाचा संसर्ग आणि कफ याबाबतही सिटी स्कॅन करण्यात आले. या काळात, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंनगारे आणि माजी खासदार राहुल शेवाळे हेही ज्युपिटर रुग्णालयात शिंदे यांना भेटण्यासाठी आले होते.

शिंदे यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी निगेटिव्ह आली असून, त्यांना अशक्तपणा आणि ताप यामुळे अँटी बायोटिक औषधे देण्यात येत आहेत. त्यांनी आराम घेतला आहे आणि त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *