News Bharati

‘सत्ता आणि पदाने मोह पाडला नाही’, श्रीकांत शिंदे यांची एकनाथ शिंदे यांच्यावर भावनिक पोस्ट

महाराष्ट्र : महायुतीला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळालं आणि त्यानंतर राज्यात मुख्यमंत्री कोण असणार यावर ताणतणाव निर्माण झाला. या मुद्द्यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नाव पुन्हा समोर येत असून, काल काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरचा आपला दावा सोडण्याचे संकेत दिले आणि सांगितले की, ‘लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ’ ही ओळख त्यांच्या जीवनात महत्वाची आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा झाला आहे, आणि आता भाजपचे वरिष्ठ नेते यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याच वेळी, एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी आपल्या वडिलांसाठी एक भावनिक पोस्ट लिहीली आहे. ‘गोर – गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे. खूप अभिमान वाटतो बाबा!’ असे ते पोस्टमध्ये म्हणाले असून, त्यांच्या पोस्टची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

श्रीकांत शिंदे यांनी पोस्ट मध्ये काय लिहिलंय पहा…

मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा मिळवली. ते स्वतःला ‘सीएम’ म्हणजे ‘कॉमन मॅन’ समजत. त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला.

कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्यभावना दिसून येते. आज त्यांनी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी आणि माननीय श्री. अमित शहाजी यांच्यावर विश्वास ठेवून, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवले आहे.

सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले. त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गोर – गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे. खूप अभिमान वाटतो बाबा! असे त्यांनी पोस्ट मध्ये लिहलं आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *