News Bharati

गॅरंटीपूर्तीच्या काँग्रेस मंत्र्यांकडून फक्त थापा माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची टीका

महाविकास आघाडी पैकी फक्त काँग्रेसची तीन राज्यात सरकारे आहेत. त्या ठिकाणी काँग्रेसने जेवढी वचने दिली, आश्वासने दिली आणि गॅरंटी दिली त्यापैकी अनेक गॅरंटी मुळीच पूर्ण झाल्या नाहीत. त्यांचे मंत्री इथे महाराष्ट्रात येऊन थापा मारून गेले, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. 

पुण्यात प्रकाश जावडेकर यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषदेत बोलताना जावडेकर म्हणाले, काँग्रेसचे सरकार ज्या राज्यात आहे तेथील कारभाराचा मी फक्त संक्षिप्त आढावा घेतो. हिमाचल प्रदेशात काँग्रेसने आश्वासन दिले होते की दरवर्षी एक लाख नोकऱ्या देऊ. प्रत्यक्षात दीड लाख सरकारी पदे त्यांनी रद्द केली आणि पुढील दोन वर्ष भरती न करण्याचा निर्णय घेतला. दुसरे आश्वासन ओल्ड पेन्शन देण्याचे होते. परंतु प्रत्यक्षात सध्याचा पगारच वेळेवर मिळत नाही अशी व्यथा आहे. त्याचप्रमाणे बेरोजगारांना दरमहा भत्ता देण्याची गॅरंटी देण्यात आली होती, परंतु प्रत्यक्षात कुणाही युवकांना असे पैसे देण्यात आले नाहीत. 

कर्नाटकमध्ये काँग्रेसने दोन लाख युवकांना दरमहा ३००० रुपये बेरोजगार भत्ता देण्याची गॅरंटी दिली होती. प्रत्यक्षात तोंडाला पाने पुसली गेली. महिलांना दरमहा दोन हजार रुपये देण्याचे मान्य करून प्रत्यक्षात गेल्या दोन महिन्यात हे पेन्शन देण्यात आले नाही. तेलंगणात बेरोजगार आणि महिला पेन्शन दिलेले नाही.त्यामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या गॅरंटी म्हणजे निश्चित फसवणूक करण्याचा जाहीरनामा आहे, अशीही टीका जावडेकर यांनी केली. 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मध्यंतरी एक लेख लिहून देशातील उद्योग जगतामध्ये मक्तेदारी होऊन, ठराविक उद्योगांनाच वाव मिळतो, अशी मांडणी केली आहे. परंतु ही सर्वथा धूळफेक आहे. अशी व्यवस्था काँग्रेस सत्तेत असताना होती. तेव्हा लायसन्स, परमिट राज होते. आता व्यवस्था नीट झाल्यामुळे नवे उद्योग फार मोठ्या संख्येने स्थापन होत आहेत. केवळ स्टार्टअपचा विचार केला, तर २०१४ मध्ये देशामध्ये ४०० स्टार्ट अप होते. आता १ लाख ४० हजार स्टार्टअप आहेत. हे उद्योगांचे खऱ्या अर्थाने लोकशाहीकरण आहे, मक्तेदारीकरण नाही. 

कारण त्यामध्ये कोणताही युवक स्वतंत्रपणे आपला उद्योग सुरू करू शकत आहे आणि त्याला चांगले यशही येत आहे. मक्तेदारी आणि काही लोकांच्याच उद्योगाला लायसन्स परमिट देण्याचे काम काँग्रेसच्या राजवटीत होत होते. मोदी सरकारच्या काळात उद्योग धंद्यांचे लोकशाहीकरण झाले असून, सर्वांना उद्योग करायला आता खऱ्या अर्थाने प्रोत्साहन मिळत आहे, असे जावडेकर यांनी सांगितले.

महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बदलण्यात येईल, आरक्षण संपवण्यात येईल असा खोटा प्रचार केला होता.  पण आता जनतेला त्यातला खोटेपणा लक्षात आला आहे. अमेरिकेमध्ये भारतामधील आरक्षण रद्द करण्याचे विचार राहुल गांधींनी व्यक्त केले आणि नाना पटोले यांनी ते योग्य ठरवले हेच महाविकास आघाडीचे खरे स्वरूप आहे. मतदारांना याची जाणीव आहे आणि मतदार या वेळेला महायुतीला प्रचंड मोठा विजय देतील असा मला विश्वास आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *