News Bharati

पर्यावरण व शाश्वत विकासासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल

पर्यावरण व शाश्वत विकासासाठी महाराष्ट्रात होत असलेल्या कामांची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सन्मान जागतिक कृषि परिषदेचे पदाधिकारी स्वतः महाराष्ट्रात येऊन करणार आहेत, ही गोष्ट महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी अभिमानाची आहे. आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधत जागतिक कृषि परिषदेच्या वतीने या कार्यक्रमाचे 18 सप्टेंबर 2024 रोजी मुंबईतील एन सी पी ए सभागृहात आयोजन करण्यात आले आहे.

 उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ‘मंत्रालय व विधीमंडळ पत्रकार कक्ष’ सभागृह येथे पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. राष्ट्रीय बांबू मिशनचे सदस्य व राज्य टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.

 यापूर्वी हा सन्मान सोहळा वॉशिंग्टन डीसी येथे आयोजित केला होता. परंतु कार्य बाहुल्यामुळे तेथे येण्यास मुख्यमंत्र्यांनी असमर्थता दर्शवल्याने परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे येऊन आम्ही मुख्यमंत्र्यांचा सत्कार करू, अशा पद्धतीने विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. मुंबई येथे होणाऱ्या सन्मान सोहळ्यासाठी 18 सप्टेंबर 2024 रोजी जगातील विविध 20 देशांचे फोरमचे पदाधिकारी आणि 20 देशांचे भारतातील दूतावासात नियुक्त राजनीतिक उच्चाधिकारी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा सत्कार सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

पर्यावरण व शाश्वत विकासासाठी महाराष्ट्रात प्रयत्न

 मुख्यमंत्री शिंदे यांनी पर्यावरण व शाश्वत विकास कृतीदलाची स्थापना केली असून त्याचे अध्यक्ष स्वतः शिंदे असून अंमलबजावणीसाठी कार्यकारी अध्यक्षपदी पाशा पटेल यांना नेमले आहे. संबंधित सचिव यांचे कार्यकारी मंडळ तयार करण्यात आले आहे. औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये 5% बायोमास वापरायचे निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत. त्यासाठी 21 लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी एक लाख वीस हजार एकर क्षेत्रामध्ये बांबू लागवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

 कृषी क्षेत्रातील प्रगतीच्या अनुषंगाने भविष्यातील धोरण आणि जागतिक स्तरांवर होत असलेल्या कामांची दखल घेऊन जागतिक पुरस्कारासाठी जगातील विविध देशातून नामांकन विचारात घेण्यात येतात. जागतिक परिणामकारक वनस्पती विज्ञान, कृषी विषयक विविध पैलूंबद्दल माहिती घेताना उत्पादन, व्यापार, तंत्रज्ञान, व्यवसाय, धोरण आणि आर्थिक परिस्थिती, पोषण, अन्न प्रक्रिया, पाणी आणि पर्यावरण या व्यापक बाबींचा समावेश करते.यासाठी योग्यता आणि पूर्णतेसाठी नामांकनांचे पुनर्विलोकन करून, ते निवडीसाठी पाठवले जातात. निवड समिती नंतर नामांकनांचे पुनर्विलोकन करते आणि प्राप्तकर्त्याची शिफारस करते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *