News Bharati

संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे डॉ. कलाम यांचे स्वप्न पूर्ण

डॉ. कलाम यांची उत्कट इच्छाशक्ती आणि ध्यास यामुळेच भारताने भूदल, नौदल, हवाईदल अशा तिन्ही प्रकारांत आत्मनिर्भरता संपादन केली. २०१४ नंतर या क्षेत्रात भारताने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एकेकाळी संरक्षण, तंत्रज्ञान आणि सामग्री आयात करणारा भारत आता या क्षेत्रातील प्रमुख निर्यातदार झाला आहे.

संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर व्हावा हे मिसाईलमॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांंचे स्वप्न २०१४ नंतर भारताने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे पूर्ण झाले आहे, असे प्रतिपादन ए. आर. डी. ई. पुणे येथील सेवानिवृत्त शास्त्रज्ञ काशीनाथ देवधर यांनी केले. निगडी प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर सदनात स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेच्या समारोप सत ‘भारताची संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता’ या विषयावर देवधर यांचे व्याख्यान झाले.

देवधर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील संरक्षण क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचा आलेख मांडला. ते म्हणाले, विशेषतः २०१४ नंतर या क्षेत्रात भारताने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एकेकाळी संरक्षण, तंत्रज्ञान आणि सामग्री आयात करणारा भारत आता या क्षेत्रातील प्रमुख निर्यातदार झाला आहे. भारताला अर्जुन रणगाडे निर्मितीच्या ७५२३ कोटींची, पीनाक रॉकेट निर्मितीच्या ११००० कोटींची, तोफा निर्मितीची ३३५६ कोटींची, तेजस विमाने निर्मितीची ४८००० कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. ही आकडेवारी भारताच्या आत्मनिर्भरतेची ग्वाही देणारी आहे.

अमेरिकेतून अण्वस्त्र तंत्रज्ञान अवगत केल्यावर डॉ. अब्दुल कलाम यांना नासा या संस्थेमार्फत लठ्ठ पगाराच्या नोकरीसह अनेक सुविधांचे आमिष दाखविण्यात आले होते. विविध प्रकारचे तंत्रज्ञान आणि संरक्षण सामग्री परदेशातून आयात करावी लागत होती. कठोर परिश्रम घेऊन डॉ. अब्दुल कलाम, त्यांचे सहकारी आणि वरिष्ठ यांनी अवकाश संशोधन आणि संरक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण योगदानातून यश संपादन केले, असे देवधर यांनी सांगितले.

अण्वस्त्र चाचणीनंतर आर्थिक निर्बंधांसह अनेक गोष्टींवर प्रतिबंध लादले गेले; परंतु ही इष्टापत्ती मानून भारताने अवकाश संशोधन आणि संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी, आकाश, त्रिशूल, नाग, अग्नी अशी क्षेपणास्त्रे निर्माण करून भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्माण केला. संरक्षणक्षमता मजबूत असल्याशिवाय जगात तुम्हाला कोणी किंमत देत नाही, हे सत्य भारताला उमगल्याने आपली अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रे आणि शस्त्रास्त्रे ही आपल्या संस्कृतीची ओळख सांगणारी असावीत, अशी कलाम यांची इच्छा होती, असे ते म्हणाले.

कलामांची शाबासकी हा सर्वोच्च पुरस्कार
कारगिल युद्धात हिमालयातील पर्वतरांगांमध्ये वाहून नेता येतील, अशा हलक्या वजनाच्या तोफा निर्माण
करण्याचे आव्हान ए. आर. डी. ई. पुढे होते. ते यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांची चाचणी थेट कारगिल युद्धभूमीवर घेण्यात आली. या संदर्भात कलाम यांनी माझ्या पाठीवर दिलेली शाबासकीची थाप, हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च पुरस्कार आहे. त्यांची उत्कट इच्छाशक्ती आणि ध्यास यामुळेच भारताने भूदल, नौदल, हवाईदल अशा तिन्ही प्रकारांत आत्मनिर्भरता संपादन केली असल्याचेही देवधर यांनी यावेळी अभिमानाने सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *