News Bharati

महसूल विभागाने शंभर दिवसांसाठीचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा – चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : महसूल विभाग (Department of Revenue) हा प्रत्येक सामान्य माणसाच्या दैनंदिन कामकाजाशी निगडीत असलेला एक महत्त्वपूर्ण विभाग आहे. या विभागाच्या सर्वसमावेशक कामकाजाच्या, सुविधा आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे शासनाची प्रतिमा जनसामान्यात उंचावते. मुख्यमंत्री यांच्या दूरदृष्टीतून आणि मार्गदर्शनाखाली, महसूल विभागात शंभर दिवसांचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याची योजना आहे, ज्यामुळे जनतेला शासनाच्या सेवा अधिक जलद गतीने उपलब्ध होणार आहेत. या संदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी संबंधित अधिकारी आणि विभागांना संबंधित मार्गदर्शक सूचनाही दिल्या.

महसूल विभाग अंतर्गत शंभर दिवसांत घेण्यात येत असलेले कार्यक्रम, योजनांचा आढावा महसूल मंत्री बावनकुळे यांनी घेतला. मंत्रालयातील समिती सभागृहात झालेल्या बैठकीस अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, उपसचिव अजित देशमुख, धनंजय निकम, सत्यनारायण बजाज आदी उपस्थित होते.

नागरिकांना महसूल विभागाच्या जास्तीत जास्त सेवा online देण्यासाठी पोर्टलचा अधिकाधिक वापर करावा. यामध्ये जमीन पोर्टल, महाखनिज पोर्टल, आपली चावडी, ई चावडी यासारख्या प्रणालींचा वापर करावा. महसूल विभागाचे निर्णय तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याबरोबरच कार्यशाळा आयोजित कराव्यात. नोंदणी व मुद्रांक विभागातील कार्यालयांमध्ये सुविधा निर्माण कराव्यात. क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात नियमित भेटी देऊन योजना, उपक्रमांचा आढावा घ्यावा, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *