News Bharati

राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड

नागपूर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता त्यांचे सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत तर, उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार विराजमान झाले आहेत. यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला. यात 33 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. त्यातच आता भाजप नेते प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांना एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. राम शिंदे यांची विधानपरिषद सभापती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1869653331242840325

विधानपरिषदेच्या सभापतीपदी कोणाची निवड केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेना नेत्या आमदार निलम गोऱ्हे या विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी इच्छुक होत्या. विधानपरिषदेचे सभापतीपद आपल्याला मिळावे, यासाठी शिवसेनेने जोरदार प्रयत्न केले होते. मात्र विधान परिषदेतील संख्याबळामुळे भाजपने स्वत:कडे सभापतीपद ठेवले आहे.

विधानपरिषदेचे सभापती पदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडली. राम शिंदे यांनी काल विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. या पदासाठी अर्ज करण्यासाठी १८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. तर सभापतीपदासाठी १९ डिसेंबर रोजी निवडणूक होईल असे सांगण्यात आले होते. त्यानुसार, विधानपरिषदेचे सभापतीपदासाठी फक्त राम शिंदे यांचा अर्ज दाखल झाला होता. यामुळे भाजप नेते राम शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापती म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी कारभार स्वीकारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी राम शिंदेंना शुभेच्छा दिल्या.

“मी राम शिंदे यांचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो. या सभागृहाने एकमताने राम शिंदे यांची सभागृहाच्या सभापतीपदी निवड केली, त्याबद्दल मी सभागृहाचेही आभार मानतो. सभापतीपदाची निवड ही निवडणूक पद्धतीने होत असली तरी एकमताने सभापतीची निवड करावी, या परंपरेला साजेसा निर्णय विरोधी पक्षाने घेतला. त्याबद्दल मी विरोध पक्षाचे अतिशय मनापासून आभार मानतो. प्राध्यापक राम शिंदे हे जे सर आहेत. त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना निश्चित सवय आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की तुम्ही अतिशय शिस्तीने आणि संवेदनशीलतेने या सभागृहाचा कारभार चालवाल, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *