News Bharati

सोयाबीनला किमान ४ हजार ८९२ रु. प्रतिक्विंटल दर; केंद्र सरकारची घोषणा

मुंबई – केंद्र सरकारकडे केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्रात 90 दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन (soybean) खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. केंद्राच्या समर्थन मूल्य योजनेअंतर्गत सोयाबीन व उडीद ही दोन पिके किमान हमीभावाने खरेदी केंद्रांमार्फत खरेदी करण्यात येतील. सोयाबीन खरेदीसाठी किमान 4,892 रुपये प्रतिक्विंटल इतका दर निश्चित करण्यात आला आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) हे राज्य कृषि महोत्सवाच्या निमित्ताने परळीत आले तेव्हा धनंजय मुंडे यांनी याबाबत मागणी केली होती, तसेच दिल्ली येथे भेटूनही याबाबत पाठपुरावा केला होता.

केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ही ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली असून, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांसह वेळोवेळी पाठपुरावा व समर्थन देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत.

त्याचबरोबर, खाद्यतेल, सोया मिल्क, सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यावर शुल्क लावावे तसेच सोयाबीन निर्यातीसाठी प्रतिक्विंटल किमान 50 डॉलर इतके अनुदान द्यावे याबाबत देखील केंद्रीय कृषिमंत्री मा.शिवराजसिंह चौहान यांच्याशी चर्चा झाली असून यावर सकारात्मक निर्णय झाल्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार असल्याचा मला मनापासून आनंद होतो आहे, अशा भावना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.

मागील वर्षी सोयाबीनचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. मात्र त्याही परिस्थितीत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सातत्याने पाठपुरावा करून राज्य शासनाच्या वतीने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. यासाठी राज्य सरकारने 4200 कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून दिले असून लवकरच या अनुदानाचे थेट वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *