News Bharati

मालेगावच्या कृषी विज्ञान संकुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय

मुंबई : मालेगावच्या कृषी विज्ञान संकुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सूचनेनुसार नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील काष्टी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कृषी विज्ञान संकुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच कृषिमंत्री धंनजय मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे विनंती केली होती.

मंत्री दादाजी भुसे यांच्या विनंतीनुसार सदर कृषी विज्ञान संकुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी विभागास केल्या होत्या. त्यानुसार कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ निर्णय घेत काष्टी येथील ‘कृषी विज्ञान संकुलाचे नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल, काष्टी ता.मालेगाव जि.नाशिक’ असे करण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, तसेच त्याचा समाजातील शेतकरी योग्य प्रचार व प्रसार व्हावा या दृष्टीने हे कृषी विज्ञान संकुल अत्यंत उपयुक्त असून या संकुलात दरवर्षी सुमारे 320 विद्यार्थी प्रवेश घेतात तर साधारण चार वर्षांमध्ये बाराशे पेक्षा जास्त विद्यार्थी येथे शिक्षण घेत असतात. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव या कृषी विज्ञान संकुलास दिल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *